मी राहत असलेल्या सदाशिव पेठ मधून.लक्ष्मी रास्ता पार केल्यावर नारायण पेठेत आपण प्रवेश करतो ते साठ्यांच्या धुंडिराज मंगल कार्यालयाशी . तिथे डावीकडे वळल्या वर लगेचच आपल्याला दिसते ते
"मोदी गणपती मंदिर"
मला लहानपणापासूनच या नावाचं फार नवल वाटे. जुन्नरकर, केसकर, लिमये अशा नावांशी निगडित असणाऱ्या सभोवतालच्या मंदिरांमध्ये हे मोदी गणपती नाव ऐकावयास विसंगत वाटे त्यातून मोदी हे गुजराती, कि मराठी (कंदी पेढेवाले सातारचे हे मोदी च आहेत) का पारशी याचा गुंता सुटत नसे.
वरताण म्हणजे याचे दुसरे नाव बोम्बल्या गणपती असे समजल्यावर मी गणेशाला लोटांगण घातले. जवळच शनिवार पेठेत "गुपचूप गणपती" आणि इथे बोंबल्या गणपती!?
हा भाग भट वाडी नावाने ओळखला जायचा. पेशवाईत बरीच भट कुटुंबे पुण्यात येऊन या भागात स्थायिक झाली भटांचा बोळ हि त्यांचीच वसाहत. पेशवे आणि इंग्रजी साहेबाचे संभाषण एका दुभाष्या मार्फत होत असे. त्यासाठी साहेबाचा पगारी नोकर म्हणून एक पारशी दुभाष्या होता. त्याचे नाव होते खुश्रू सेठ मोदी.
या भागात त्याचा मोठा बंगला होता. बागेतल्या आवारातल्या पारावर हा गणपती होता असे सांगतात.भट कुटुंबीय याची पूजा करत असत असे सांगितले जाते. पुढे साहेबाने खुश्रू सेठ च्या इमानदारी वर संशय घेतला.पेशव्यांना सामील असल्याच्या आरोपाने तो फार दुखावला गेला, आणि त्याने आत्महत्या केली. एका सज्जन पारशांचा अंत झाला. पण त्याचे नाव मात्र गणपतीच्या बरोबरीने आजही घेतले जाते.
आज हि भट घराण्या कडे याची वहिवाट आहे. भट घराण्याला मात्र याच्या भक्ती आणि सेवेने उर्जितावस्था प्राप्त झाली. आजही जरी या देवळाला भव्यता नसली तरी शांती , पावित्र्य, समाधान आणि विनायकाचा,वरद हस्त लाभला आहे.
श्री गणेशाय नमः
ता.क :- दुसऱ्या नावाचा उलगडा मात्र अजूनही झाला नाही
(छाया चित्रे इतरत्र उपलब्ध ठिकाणा वरून घेतली आहेत. माझी नव्हेत)
Comments