top of page
Writer's pictureRanjit Ghatge

बोहरी अळी -पुण्याची घाऊक बाजार पेठ .

बोहरी अळी म्हणले, प्रचंड गर्दी, हार्डवेअर, पेंट, डेकोरेशन चे सामान, वेग वेगळी अवजारे, जे म्हणाल ते सामान घाऊक किमतीत आणि घाऊक प्रमाणात मिळण्याचे ठिकाण.

काही गुजराती सोडले तर बोहरी लोकांचे अधिक्य असलेली बाजार पेठ .

पांढऱ्या तुमानी , पांढरे कोट , सोनेरी काम असलेली विशिष्ट आकाराची टोपी , कोरलेल्या विशिष्ट आकाराच्या दाढ्या, आणि अगत्यशील आणि न दमता अखंड सामान दाखवण्याची चिकाटी, अशी हि उमदी दिसणारी, उद्यमशील जमात .



पुढल्या बाजूने अनेक खिडक्या आणि बंद गॅलऱ्या, रंगी बेरंगी काचा लावलेली तावदाने, अशी दुसऱ्या मजल्या वरची घरे आणि खाली दुकाने अशी सर्वसाधारण ठेवण असलेली बाजार पेठ असा सर्वसाधारण तोंडवळा असणारी हि अळी.





प्रथम निजामशाही वझीर मलिक अंबर च्या नावाने मलकापुरा नावाने हि वसलेली पेठ आणि नंतर नाना फडणविसाने साप्ताहिक वारांच्या नावाने बदलेल्या पेठांच्या नावाने आताची रविवार पेठ.

पेशव्यांच्या काळात व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी वेग वेगळ्या जाती जमातींच्या लोकांना प्रोत्साहित केले .

त्यामध्ये हे दाऊदी बोहरा लोक, नगर, औरंगाबाद आणि काही गुजरातेतून पुण्यात आले .या सर्व ठिकाणी मुसलमानी राजवटी आणि साम्राज्य होती.


कादर मंझिल. १९२८. जमाना ताहेर सैफी
कादर मंझिल. १९२८. जमना ताहेर सैफी

नगरची निजामशाही , औरंगाबादची कुतुबशाही किंवा गुजरातेतली मुसलमानी सल्तनत . या मुळे तेथे राहणारे हे शिया मुसलमान लोक जात्याच व्यापारी होते. .

त्यांची मस्जिद आणि जमात खाना १७३० साली सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधले गेले आहेत.

शनिवार वाडा १७३० ते १७३२ च्या दरम्यान बांधला गेला, त्या वरून आपल्याला त्यांचा पुण्यातला रहिवास किती जुना आहे ते कळते.


जमतखाना. बोहरी मस्जिद
जमातखाना. बोहरी मस्जिद

उत्तम प्रतीचे मँचेस्टर कॉटन, आयात केलेल्या चायना क्रोकेरी, उत्तम कट ग्लासच्या वस्तू यामध्ये त्यांची मक्तेदारी होती. एवढेच काय येवल्याचे, पैठणचे आणि सुरतेचे उच्च प्रतीचे रेशीम हि पण यांची खासियत होती .पेशवाई शिरपेच , पागोटी , शेले , यासाठी हे रेशीम वापरले जाई.

अतिशय धनाढ्य असणारी हि व्यापारी जमात पुण्याचे अंगच बनून गेली .

पुढे इंग्रजांच्या काळात जसे कॅम्प वसले, तशी काही कुटुंबे तिकडेही स्थिरावली.

ताहेर अली, सैफी, असगर अली, तय्यबजी अशा नावाची बरीच कुटुंबे आज ही तिथे दुसऱ्या तिसऱ्या पिढीत सफल व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत .


व्यापाऱ्यांच्या वार्षिक हिशोबांसाठी लागणाऱ्या चोपड्या इथे प्रामुख्याने मिळतात .

लाल रंगाचे कापडी वेष्टन व त्याच्यावरचे पांढऱ्या धाग्याने काढलेले ठराविक डिझाईन असा या चोपडीचा

वर्षानु वर्षे तोच तोंडवळा आहे.

दिवाळीच्या अगोदर उत्तम मुहूर्त बघून गुजराती मारवाडी व्यापारी या चोपड्यांच्या खरेदीसाठी येतात . ठराविक.

बोहरी माणसाच्या हातूनच त्या चोपड्या घेण्याचा त्यांचा आग्रह असतो .त्या मुळे कधी कधी नव्वदीतले वृद्ध बोहरी घरातून खाली येऊन त्यांना त्या चोपड्या देतात.

कधी कधी मुहूर्त मध्यरात्रीचा किंवा त्याच्या पुढचा असतो.

तरी अपरात्री प्रसन्न मुद्रेने हे वयस्कर वृद्ध शुचिर्भूत होऊन व्यापाऱ्यांच्या हातात चोपड्या मखमली कापडातठेवून भक्तिभावाने , चोपडीला व घेणाऱ्याला कुंकू लावून सुपूर्द करतात.

हातगुणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना हा हृद्य सोहळा अतिशय महत्वाचा वाटतो .

त्याच बरोबर चोपडी देणाऱ्या वयोवृद्ध बोहरी आजोबाना गलबलून येते , आपल्या हस्त स्पर्शाने येणाऱ्याबरकतीवर असणाऱ्या व्यापाऱ्याचा विश्वास त्यांच्या सरत्या दिवसातला एक भावनिक क्षण असतो .


लक्ष्मीनारायण मार्केट
लक्ष्मीनारायण मार्केट

सचोटीचा व्यवहार, हसतमुख, आणि अगत्यशीलता यामुळे सफल झालेली हि कुटुंबे सय्यदना बुऱ्हानुद्दीन धर्मगुरूंचे अनुयायी आहेत. साधारण २० लाखाच्या आसपास भारतातली यांची लोक संख्या आहे. मक्केमधील हाशीमी बोहरा लोक साधारण १६५० ते १७०० च्या दरम्यान भारतात आले असावेत.

यांचे एक प्रमुख धर्मगुरू आणि महात्मा गांधींचा परिचय होता. एवढेच नव्हे तर गांधीजींच्या दांडी यात्रे दरम्यान गांधीजी दांडी मध्ये " सैफी विला " नावाच्या बोहरा घरामध्ये राहिले होते.

मक्केमधल्या हाशिमी कुल हे त्यांचे आद्य कुळ असल्याचे ते सांगतात.



काळानुसार , त्यांनी होलसेल मध्ये स्टेशनरी, सेंट्स , थर्मोकोल चे सामान, बाग कामासाठी लागणारे साहित्य अशी बरीच नवीन उत्पादने व्यापारात समाविष्ट केली.

अश्या या भूल भुलय्याच्या बाजार पेठेत तुम्ही लहान मुलासारखे हरखून जाता .

गर्दी चुकवत चुकवत , इथले बहुविध सामान बघता बघता तुमचे २-३ तास आणि त्यापेक्षा जास्त पैसे, कसे निघून जातात हे तुम्हालाही कळत नाही .


138 views0 comments

Comentarios


bottom of page