top of page
Writer's pictureRanjit Ghatge

गुड लक नावाचे गारुड

Updated: Aug 7, 2020


पूर्वीच्या पुण्यात उपहारगृहे फारच थोडी होती , बाहेर जाऊन खाणे हे कुटुंब वत्सल माणसाचे लक्षण समजले जात नव्हते. त्यातही मुसलमान, पारशी, ख्रिस्ती, हॉटेलात जाणे हे अगदीच निषिद्ध होते. अशा काळात १९३० च्या सुमारास, पुण्यात आणि तेही गावात अशी ३-४ इराणी कॅफे सुरु करायची हे मोठेच धारिष्ट्याचे काम होते.


रिगल, लकी, गुड लक, सन राईज, अशी काही हॉटेल्स, पेठांच्या आजू बाजू सुरु झाली होती. कॅम्प मध्ये या हॉटेलांना काही अडचणी नव्हत्या, कारण तिथल्या बहू धर्मीय रहिवाशांना अंडी, पाव, मटण,अशा पदार्थांचा विधी निषेध नव्हता. पण गावात मात्र हे पदार्थ निषिद्ध होते. पाव हे तर धर्मांतराचे साधन मानले जाई. ख्रिस्ती लोकानी विहिरीत पाव टाकून गावें बाटवल्याच्या कथा पूर्वी सांगितल्या जात. अशा काळातहि इराणी हॉटेल्सने आपले पाय रोवणे म्हणजे मोठी गोष्ट होती.


आज गुड लक सोडून बाकीची इराणी हॉटेल बंद झाली आहेत.बहुतेक सर्व इराणी हॉटेल्स थिएटरच्या जवळ होती. रिगल हे अलका टॉकिज जवळ, तर गुड लक, लकी, सन राईज हि हॉटेल डेक्कन व हिन्दविजय (नंतरचे नटराज ) टॉकीज च्या जवळ होती. ह्या हॉटेलांचा मेनू त्यावेळेस, बन मस्का, ऑम्लेट, ब्रून मस्का, क्रिम रोल्स, त्यांचा सुप्रसिद्ध चहा आणि मोजक्या नॉन व्हेज डिशेस, असा सीमित होता.



गुड लक १९३४ साली सुरु झाले (सध्याचे मालक घासेम हुसेन अली यक्षी यांच्याकडे १९२४ मधले एक जुने फूड लायसेन्स मिळाले आहे). हे हॉटेल रिगल च्या मालकांनीच छोट्याश्या जागेत चालू केले होते. हुसेन अली यक्षी नावाचा होतकरू मुलगा येथे कामाला लागला. तो इराणहुन आला होता. त्याला या छोट्याशा हॉटेल मध्ये मॅनेजर ची नोकरी मिळाली.काही महिन्या नंतर त्याने पगाराची मागणी केली. तेंव्हा मालकांनी हॉटेलच घेण्याची ऑफर दिली. तेथूनच हुसेन अली यांच्या गुड लक च्या प्रवासाची सुरुवात झाली.


इतर इराणी हॉटेल्स प्रमाणेच बेन्ट वूड च्या काळ्या रंगाच्या खुर्च्या, त्याच रंगाची टेबल्स, सभोवताली आरसे, काचेचा शोकेस सारखा काउंटर, त्या मागे ठेवलेले केक्स, काचेच्या बरण्यात ठेवलेली, बिस्किटे, क्रीम रोल्स, असा सर्व सामान्यपणे इराणी हॉटेल चा सेटअप गुड लक मध्येही तसाच होता. सर्व सामान्य कप बशा, स्टीलच्या ताटल्या, काटे, चमचे, काचेचे ग्लास, सर्व सामान्य कटलरी, काहीही गोष्टी भपकेबाज ,हाय फाय नव्हत्या. इथला आनंद हा दृष्टीने घेण्यापेक्षा जिभेने घेण्याचा होता. अर्थात मऊ लुसलुशीत बन पावामधून डोकवणारा सोनेरी लोण्याचा थर, उकळत्या सोनेरी तपकिरी चहाचा उत्तेजक गंध, डोळ्याला सुखद आणि जिभेला परमानंद देणारा असे. हा बन पाव सर्व शिष्टाचार सोडून कपात बुचकळून खाण्यातच त्याची मजा होती. दोन घासानंतर चहावर लोण्याचा पातळसा तवंग येई, त्या तुपकट चहाचे घुटके घेत चवीत पूर्णपणे बुडून जाणे, हाच शिष्टाचार, आणि हीच खायची खरी पद्धत!


यांचं ऑम्लेट थोड्याश्या ब्राऊन रंगाकडे जाणारे, बिन कांद्याचे असे, कांदा ,कोथिंबीर ,मिरची वाले मसाला ऑम्लेट मागवावे लागे. पण अंड्याचा खरा स्वाद बिन मसाल्याच्या ऑम्लेट मध्ये उभारून येई. बाजूला थोड्याश्या बरबटलेल्या टोमॅटो सॉस ची प्लास्टिकची लाल रंगाची आणि पांढऱ्या झाकणाची बाटली असे. सॉसचे ओघळ बाटलीवर दिसत असत. त्यांकडे न बघता आपल्याला पाहिजे तेवढा सॉस वाढून, तोंड चालू ठेवणं व चवीचा आनंद घेणं ह्यातच मजा होती. सगळा बन मस्का किंवा ब्रून मस्का फस्त करण्यासाठी एक कप चहा कधीच पुरत नव्हता. ज्यांना खरपूसपणा, कुरकुरीतपणा ची आवड आहे त्यांच्यासाठी ब्रून मस्का हा एक वेगळा अनुभव!

बन पावापेक्षा अगदी वेगळ्या जात कुळीतला, हा पाव कडक आवरणाचा पण मऊ अंतर्भाग असलेला, असा ब्रून खाणे म्हणजे चव, स्वाद, आणि टेक्सचर याचा त्रिवेणी संगम असे. या खेरीज खिमा पाव, खिमा सामोसा, चिकन फ्राईड इन एग्स, भेजा फ्राय, वगैरे नॉन व्हेज मधले खवय्यांचे आवडते प्रकार. कॅरॅमल कस्टर्ड , ब्रेड पुडिंग, हे डेझर्ट मधले लोकप्रिय प्रकार.



परत गुडलकच्या इतिहासा कडे वळू. हुसेन अली यक्षींचे १९८९ मध्ये निधन झाले यानंतर त्यांचे भाऊ कासीम अली यांनी धंद्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्या काळात कठोर श्रम घेऊन त्यांनी धंद्याची भरघोस वाढ केली, हुसेनचा अली चा मुलगा घासेम यांनी काकांच्या हाताखाली खूप कष्ट केले. पुढे कासिमशेठ यांचेही २००१ मध्ये निधन झाले. मग मात्र घासेमने हॉटेलची जबाबदारी पूर्णपणे उचलली. २००४ साला पर्यंत गुड लक ला तरुणाईचा प्रतिसाद फारसा नव्हता, घासेम ने मेनू मध्ये मोठे बदल केले. त्याने तवा आणि तंदुरी पदार्थ वाढवले, हळू हळू वयस्कांचे हॉटेल अशी इमेज जाऊन, तरुणांचे हँग आऊट अशी इमेज तयार झाली. हॉटेल फुलून गेले, बाहेर वेटिंग सुरु झाले, आणि फॅमिलीज सुद्धा गर्दी करू लागल्या.


सध्याचे वारसदार घासेम याकशी, हे लोयोला, फर्ग्युसन शिक्षित, स्वतःला या व्यवसायापेक्षा कॉर्पोरेट जगताचे आकर्षण असणारे, पण परंपरेसाठी, या व्यवसायात ते शिरलेले. दुसऱ्या पिढीचे वाढत्या चाळिशीतले, उत्तम मराठी बोलणारे, पुणेकर इराणी. (येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि त्यांचे नाव Ghasem असे लिहिले जाते, कासम हे त्यांचे काका होते , ज्यांना पूर्वीचे लोक कासमशेठ म्हणत). त्यांनी मेनू मध्ये मोठे वैविध्य आणले, परंपरागत नॉन वेज बरोबरच, चिकन हंडी, वेज जयपुरी, मटण कोल्हापुरी, इत्यादी सर्वमान्य डिशेसला, मेनूवर स्थान दिले, इतर इराणी रेस्टोरेंट सारखे नामशेष होण्यापेक्षा त्यांनी काळा प्रमाणे बदल स्वीकारून त्या प्रमाणे मेनू मध्ये बदल करून, आपले कॅफे चालू ठेवले, आणि वाढवले सुद्धा. विमान नगर च्या फिनिक्स मॉल आणि बाणेर मध्ये गुड लक नी "छोटा बाईट" नावानी २०१६ मध्ये शाखा सुद्धा काढली आहे. मध्यंतरी २००४ मध्ये घासेम भाईंनी कोथरूड येथे शाखा उघडली, पण ती चालली नाही. मेनू पारंपरिक ठेवला होता म्हणून त्या चालल्या नसाव्यात असे घासेम भाईंना वाटते.



मध्यंतरीच्या काळामध्ये मोठी आव्हाने आली, कामगारांचा संप, कोर्टाची केस, यामध्ये तब्बल ३-४ वर्षे हॉटेल बंद राहिले. गिर्हाईकांना एवढ्या कालावधी नंतर परत आणणे हे मोठे जिकिरीचे काम होते. पण गुड लक च्या बावनकशी ब्रॅण्डने परत व्यवसाय चालू झाला, आणि वाढला सुद्धा . १९६१ मध्ये पानशेतच्या पुराच्या वेळेस गुड लक पाण्यात बुडाले होते. त्या वेळेस त्यांचे शेजारी "सखू नंदन" मधील पुण्यातले प्रतिष्ठित श्री नारायणराव बोरावके ह्यांनीं कासेम शेठला सर्व तर्हेने मदत करून गुड लक परत चालू करण्यास मोठाच हातभार लावला. कासेम शेठ त्यांचे हे ऋण कधीही विसरले नाहीत.

मंडई गणपती विटंबना प्रकरणी गुड लक जाळायला लोक आले होते पण गोडी गुलाबीने लोकांना समजावल्या वर लोक परत गेले.


९० च्या दशकात, हॉटेल चे थोडे रिनोवेशन, एक्सटेंन्शन, केले गेले, परंपरागत, बेंटवूड चे फर्निचर काढून टाकून, जास्त जागा मिळविण्यासाठी वेगळे फर्निचर केले, यामध्ये हॉटेलचा टिपिकल इराणी लुक कमी झाला, पण जागा वाढल्या मुळे, जास्त लोकांची बसण्याची सोय झाली. आजही थोडा वेळ बाहेर वेटिंग केल्याशिवाय , आत जागा मिळत नाही. पूर्वी बेंटवूड चे फर्नीचर ऑस्ट्रीया, पोलंड, या देशांमधून आयात करावे लागे, Thornet नावाची पोलिश कंपनी यात आघाडीवर होती. घासेमने जुन्या फर्निचर मधले काही पीस आठवण आणि व्हिण्टेज म्हणून ठेवले, तसेच बेल्जीयन मिरर हि तसेच ठेवले, बाकीचे फर्निचर काढून टाकले. पूर्वीच्या बंद फॅमिली रूम्स काढून टाकल्या , आणि ओपन स्पेस कन्सेप्ट आणला.सर्विंग स्टाफला स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्या, ट्रेन केले.



पूर्वी चोरून चोरून बंद फॅमिली रूम मध्ये नॉन व्हेज खाणारे, आता निर्धास्तपणे नातवंडांबरोबर रुबाबात सर्वांबरोबर खिमा पाव खाऊ लागले. एके काळी, देवानंद, गुरुदत्त, रेहमान, हे प्रभात स्टुडिओमध्ये काम करत, त्यावेळी जेवायला, ब्रेकफास्टला गुड लक मध्ये यायचे. फिल्म इन्स्टिटयूट मध्ये शिकणाऱ्या बऱ्याच कलाकारांचा गुड लक हा आवडता अड्डा होता. नाना पाटेकर, डेविड धवन, राज कपूर हे सुद्धा इथले चाहते होते. इन्फोसिस चे नारायण मूर्ती हे सुद्धा येथे येऊन गेले आहेत. देव आनंद, चितळे बंधूंच्या दुकानाला लागून गल्लीतला जो "वसंत वीला "नावाचा बंगला आहे तिथे राहत असे.( हा बंगला तालीम कुटुंबीयांचा आहे).


असो, गुड लक आजही जुन्या जीर्ण कोकाटे बिल्डिंग मध्ये, तेवढ्याच जोमाने सुरु आहे. गुड लक ला,स्वतःची बेकरी नाही. जी जी इराणी हॉटेल् पार्शांनी चालवलेली आहेत, तिथे बेकरी हॉटेल चाच एक भाग असते. ते स्वतःचा पाव, बिस्किटे, खारी, सर्व स्वतःच बनवतात. मुंबईमधील फोर्ट मधले लिओपोल्ड, ब्रिटानिया अँड को, मेरवान, मोरनाझ, सॅसॅनियड, वगैरे हॉटेल्स इराणी पारशांची आहेत, ही हॉटेल्स उचभ्रु प्रकारची असून त्यांना स्वतःच्या बेकरीज आहेत. त्यांचा मेनू सुद्धा पारशी पद्धतीचा आहे, सल्ली बोटी,आकुरी अंडा, धानसाक राईस अशा तर्हेचे पारशी पदार्थ त्यांच्या मेनूवर आढळतात. इराणी पारशी आणि इराणी मुसलमान, ह्यांच्या खाद्य पदर्थांमधला हा फरक असावा. गुड लक हे दुसऱ्या प्रकारातील हॉटेल आहे. पण बन मस्का, ब्रून मस्का, ऑम्लेट्स, क्रीम रोल्स, आणि त्यांचा इराणी चहा मात्र सारखाच आहे.




गुड लक ला हे ग्लॅमर नसले तरी, त्याचा आत्मा तोच आहे. बाकी गावातली सर्व इराणी हॉटेल्स बंद होऊनही, गुड लक त्याच दिमाखात चालू राहिले आहे. हे हॉटेल जरी जास्त प्रमाणात यंग क्राऊड चे आवडते हॉटेल असले तरी फॅमिली रेस्टोरेंट म्हणूनही आपली ओळख ठेवून आहे. इथे कित्येक मंडळी ५० वर्षांपासूनचे नियमित येणारे खवय्ये आणि चाहते आहेत. १९६५ साला पासून अब्बास अली खानेजुरी इथले मॅनेजर आहेत .

घासेम यक्षी म्हणतात, हि माझी शेवटची पिढी,जी गुड लक चालवेल, नंतर मात्र पुढे हे हॉटेल चालू राहील कि नाही कोण जाणे? माझ्या मुलीला या व्यवसायात येणे आवडेल आणि शक्य होईल कि नाही माहित नाही.

हे उदगार ऐकल्यावर, अंतःकरण भरून येते. एका खाद्य परंपरेचा हा अंत नसावा हीच सदिच्छा आपण व्यक्त करू शकतो.


( काही संदर्भ हिंदुस्थान टाइम्स मधून )


Disclaimer: Photographs are not taken by me and are only for representational purposes. Original copyrights lie with the owners.

509 views0 comments

Comments


bottom of page