top of page
Writer's pictureRanjit Ghatge

पेठांमधील वाडे आणि वाड्यांमधले दिवस

पुण्यामधल्या सर्वसामान्य वाड्याला एक प्रकारचे एकसारखे स्वरूप असे. काही मोठे सरदारांचे वडे वगळता , बाकीच्या वाड्यांचे स्वरूप ठराविक प्रकारचे असे. बरीच बिऱ्हाडे संभाळणारे हे वाडे -पुणेरी वाडा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही .



सर्व सामान्यपणे मोठाले दरवाजे प्रवेश द्वार म्हणून क्वचित दिसायचे. आत गेल्यावर थोडा अंधारा बोळ, त्याला दोन्ही बाजूला टेकवून ठेवलेल्या सायकली . आत शिरल्यावर मोकळा चौक, उजव्या किंवा डाव्या बाजूने वर गेलेले जिने. गॅलर्यांचा passage च्या बाजूने ओळीतल्या, बिऱ्हाडांच्या खोल्या.



कित्येकांच्या घरासमोर गॅलर्यांच्या वरच्या खांबाला टांगलेल्या, डालडाच्या डब्यांमधल्या तुळशीची रोपे. खालच्या मोकळ्या चौकाच्या दोन्ही बाजूची बिर्हाडे, घरासमोरच्या तांब्याचे बंब .

एका कोपऱ्यात सामाईक संडासाची रांग. एखाद्या भाग्यवान वाड्यात विहीर असे, त्याला लागून थोडी कोरांटी, सदाफुलीची रोपे . एखादे पारिजातकाचेझाड सुद्धा काही वाड्यांमधून दिसे.



वाड्यात तुम्ही ज्या वेळेला प्रवेश कराल त्या वेळेनुसार संमिश्र असा आवाज , गंध , दृश्य , याचा एक लोळ तुमच्यावर अधिक्रम करत असे.सकाळी ९ ते १० मध्ये - राहिलेल्या गृहपाठाच्या लाखोली, पेनात शाई भरताना लवंडलेली दौत, ते आवरताना गॅस वरची जळालेली भाजी, रुमाल सापडत नाही, डबा अजून भरला नाही म्हणून झालेला त्रागा.





चिंच गुळाच्या आमटीचा किंवा फोडणीचा वास, फरा फरा आवाज करणारे पितळी स्टोव्ह, दूध उतू गेल्यावर हमखास न सापडणाऱ्या स्टोव्ह च्या पिना आणि काकडे.

गोल ठेंगण्या बरण्यांमध्ये चुबुक चुबुक ताक घुसळण्याचा आवाज, ओलसर राहिलेल्या गणवेशाला इस्त्री करून सुकवण्याची झटापट. त्यातच "कळा ज्या लागल्या जिवा " चाफा बोलेना " असल्या गीतांची "आपलीआवड " जरा कोलाहल सुसह्य करी.


त्यानंतर दुपारच्या वेळेत सर्व पुरुष मंडळी आणि पोरं शाळा ऑफिसात गेली कि स्त्रिया जरा सुस्कारा टाकीत .

जेवण खाण आटोपली कि शेजारणी कडे शिळोप्याच्या गप्पा मारता मारता, हात मात्र संध्याकाळची भाजीनिवडण्यात व्यस्त असत. थोड्याश्या कौटुंबिक आणि बर्याचश्या कुचाळक्या, झाल्या कि मग गृहिणी रेडिओवरील " वनिता मंडळा" च्या टेकाडे भावजी छाप श्रुतिका ऐकत अंमळ लवंडत असत.

वाड्यांमधले आवाज सुद्धा काही काळ विश्रांती घेत असत .


पण पुढली दृक्श्राव्य मालिका रस्त्यावर घडत असे.

टर्र टर्र आवाज करीत खांद्यावर तिकाटणें घेऊन जाणार पिंजारी, भांडाsss ई करून ओरडत जाणाऱ्या बोहारणी, काचेच्या पेटीमधून खर्वसाचे, किंवा फणसाचे गरे घेऊन जाणाऱ्या हात गाड्या. लाल फडक्याखाली झाकलेल्या कुल्फी वाल्यांच्या गाड्या, रंगी बेरंगी बाटल्यांमधली सरबते घेऊन बर्फ किसून त्याचे गोळेविकणाऱ्या गाड्यांच्या घंटांची टीन टिन .


संध्याकाळी ,परत शाळेतून परतणाऱ्या मुलांचा गलका, अस्ताव्यस्त दप्तरे भिरकावल्याचे अवाज. गणवेशाचे बोळे, आणि खेळायला जायची घाई, लगोऱ्या, चिरघोडी, अप्पा रप्पी, मधूनच आईने दिलेल्या दाणे गुळाचे तोबरे भरत, बाल चमू धुडगूस घालत असत.

पुरुष मंडळी निवांत paper बघत दडपे पोहे, किंवा तत्सम पदार्थाचा आणि गरम चहाचा आस्वाद घेत लुढकत.

अंधाराच्या सुमारास २-५ शीव्या, खाऊन खेळ थांबवून,गृहपाठ, स्तोत्रे, परवचा, म्हणत पोरं दिवस संपवायच्या मागे असत.


रेडिओ वरचा "हवा महल" बुधवारचा binaca गीत माला ,भुले बिसरे गीत , हे संध्याकाळचे करमणुकीचे कार्यक्रम असत. रेडिओवरच्या बातम्यांचा रतीब , गोपाळ दीक्षित, सुधा नरवणे, देवकीनंदन पांडे, melvyl डिमेलो, यांचाअसे.


पुढच्या काळात T .V . वर गजरा, कामलेश्वरचे परिक्रमा, छाया गीत, व्हाट्स द गुड वर्ड, ह्यांनी त्याची जागा घेतली.

रुबाबदार हरीश भिमाणी, सुहास्यवदना ज्योत्स्ना किरपेकर, धीरगंभीर तेजेश्वर सिंग, डॉली ठाकूर, लुकू सन्याल अशा सुरेख चेहेर्यानी. कार्यक्रमांची लज्जत वाढत असे.


वयोवृद्धांच्या संध्याकाळच्या दिनक्रमात , येरझाऱ्या घालत स्तोत्रे म्हणनार आजोबा, बायका, मुरलीधराच्या नाहीतर एखाद्या विठ्ठल किंवा गणपती मंदिरात कीर्तन, प्रवचनांना जात वाती वळत कुठलेसे आख्यान ऐकत.

सप्ताह वाचन , चातुर्मास , एकादष्ण्या , प्रदोष , काकड आरत्या , असल्या धार्मिक चक्रव्युहानुसार त्यांचे सकाळ किंवा संध्याकाळचे दिनक्रम थोडे बदलत असत.



वाड्यांमधल्या सण वारांवर वेगळाच लेख लिहावा लागेल. पण भोंडले, त्यांच्या खिरापती ओळखणे, पाटावरचा हत्ती, ऐलोमा पैलोमा, आरडी ग बाई परडी , असली लोकगीते आज हि आठवण करून देतात.

दिवाळीतला भाजणीचा खरपूस वास , शंकरपाळ्यांचा गोड वास , किल्ले, मोठ्या रांगोळी आणि रांगोळ्यांच्या गालिच्यांच्या स्पर्धा .


उन्हाळ्यातील कुरडया , पापड्या , पापड , भुसवड्या, सांडगे , पेनवड्यांची ,वाळवणे . गरम मसाल्यांचा खकाणा , सर्व काही आठवणीत आहे.


परीक्षा काळात मात्र वातावरण जरा गंभीर असे. गोंधळ आणि गलके कमी होत. पोरशन, ऑपशन , दांडी , हे शब्द दबक्या आणि कुजबुजत्या आवाजात ऐकू येत . रिझल्ट च्या आदल्या दिवशी पोरं पोस्टमन वाड्यात कोणाकडे आला याची चर्चा असे ( नापास झालेल्याचानिकाल शाळा पोस्टाने पाठवीत असत ).


उन्हाळी सुट्ट्यांमधून मुलं व्यापार , साप शिड्या , सागरगोटे , पत्ते , काचा पाणी , असले बैठे खेळ खेळत. काही महाभाग, टायर, सायकलच्या चाकाच्या लोखंडी रिमला , छोट्या दांडक्याने फटके मारत पळवत नेण्याचा हि खेळ खेळत.


अशा या अनंत गंध, दृश्य आणि श्राव्य स्वरूपातल्या आठवणी ,आजहि रुख रुखत्या, आणि थोडे उदास करणाऱ्या आठवणी आपल्या सर्व वाड्यात राहणाऱ्या बांधवांच्या, मर्म बंधातली ठेव म्हणून जपलेल्या असतील अशी माझी खात्री आहे.


528 views0 comments

Commentaires


bottom of page