top of page
Writer's pictureRanjit Ghatge

कबुतरांच्या धाबळी ( Pigeon Lofts)



कबुतर, कपोत, पिजनस, आपल्याला परिचित, पण फारसा न आवडणारा उपेक्षित पक्षी.

प्रेमी युगुलांना वापरण्यात येणारी सर्वमान्य साहित्यिक उपमेतील जोडी. दुरावलेल्या प्रेमिकांचा संदेश वाहक!

पण लोकांना वेड लावणारा हा छंद असू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. ज्यांचे लहानपण पुण्याच्या पेठां मधून गेले त्यांना मात्र घोळक्यानी आकाशात उडणारी वेगवेगळ्या रंगांची आणि तऱ्हांची कबुतरे मात्र अपरिचित नाहीत.


तासचे तास त्यांच्या कडे बघत शिट्या वाजवत, हातातले टायरचे तुकडे, आणि मोठाली फडकी आकाशात फेकून, किंवा काठीला फडकी बांधून फडकावणारी मंडळी आठवताहेत का? माझ्या घराच्या मागच्या चौकात एक मोठी धाबळ होती. शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवशी मी तिथे बराच वेळ घालावीत असे.

छोट्या चौकात वाड्यांचा भिंतींना टेकवलेल्या छोट्या छोट्या लाकडी कप्यात हि कबुतरे ठेवली जात - कप्प्याना जाळी लावलेली असे. आजूबाजूला जोंधळ्यांचा सडा पडलेला असे . अश्या या सर्व पसाऱ्यातल्या जागेला म्हणत धाबळ.


जवळच्या धाबळीतील उडणाऱ्या दुसऱ्या कबुतरांना भुलवून आपल्या धाबळीत आणणे हा मोठा विजय समाजला जाई. ह्यात दोन प्रकारचे समझोते धाबल मालकांमध्ये असत. एका समझोत्यामद्ये कबुतर परत केले जाई . त्याला म्हणत सलाह. तर दुसऱ्या प्रकारामध्ये कबुतर परत केले जात नसे, ते विकण्याची व आपल्याच धाबळी मध्ये ठेवण्याची बोली असे. या प्रकाराला म्हणत दावा.

कबुतरे तरी किती प्रकारची - पांढऱ्या कबुतरांना म्हणत "कागदी" ,तपकिरी "भुरा ",गळ्याभोवती ठिपके असणारी "हार दार",लाल मानेची "जर्दा ". रेस मधे वापरली जाणारी " होमिंग". या शिवाय लाडाची नावें बबऱ्या , काल्या, डम्बुल, कल सिरा, कल दुम वगैरे.




कबुतरांच्या रेसिस म्हणजे लांब पल्ल्यांच्या म्हणजे ७० -८० km पर्यंत उडून परत येणे

त्याचे टाईमिंग घेतले जाई .पायात विशिष्ट वळी घालून कबुतरांची ओळख पटविली जाई.कोणच्या कबुतराने किती उड्डाण केले व त्यास किती वेळ लागला याचे गणित करण्याची विशिष्ट पध्दत असावी. त्या प्रमाणे वेगवान कबुतर विजेते म्हणून घोषित केले जाइ .पण रेसिंग हि बरीच अलीकडची स्पर्धा पद्धती असावी. जुन्या काळी मात्र धाबळीच्या लढती, आणि हवा दाखवणे म्हणजे उडवणे हेच प्रामुख्याने खेळ असत. दुसऱ्या धाबळीचे कबुतर भुलवून आपल्या धाबळीत आणणे हाच एकमेव खेळ असे.


कबुतर प्रशिक्षणात आपल्या मूळ धाबळीत परत येण्याचे शिक्षण, आणि त्यांचा दम सास वाढविणे या साठी कबुतरांना हवा द्यावी लागते. कबुतरांचा बाजार बाल गंधर्व च्या पुढे वृद्धेश्वर मंदिर घाटा पाशी भरत असे .काही हजार रुपया पर्यंत चांगल्यया कबुतरांची किंमत असे - असे ऐकण्यात आहे. हा बाजार महाराष्ट्रातला एकमेव आहे असे म्हणतात. ह्यातले तज्ज्ञ लोक मात्र यु.पी . दिल्ली येथील मुसलमान उस्ताद लोक आहेत, रामपुरी,अलाहाबादी,साहारनपुरी , इत्यादी कबुतरांची पैदास, संगोपन, प्रशिक्षण, आणि विक्री, हॆ उस्ताद करतात. ते नवीन शागीर्द ही तयार करतात. त्या मुळेच हि कला, शौक,पुढे चालू राहिला आहे.पाकिस्तान मध्ये हि हा छंद मोठ्या प्रमाणावर जोपासला जातो.


पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर श्री . पुरंदरे हे कबुतर तज्ञ (व पशु वैद्यक चिकित्सक )राहतात. त्यांनी पक्षी शास्त्राचा अभ्यास इंग्लंड मध्ये जाऊन केला आहे. हे गृहस्थ कबुतरांचे प्रशिक्षण, निगा, रोग उपचार, या सर्व विषयांमधले जाणकार आहेत. अर्थातच, घराच्या गच्चीवर त्यांची धाबल हि आहे. आता नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हि कबुतरबाजी खूप आधुनिक झाली आहे. ईन्फ्रारेड टेकनॉलॉजी, सेन्सर्स, चिप्स, ह्यांच्या मदतीने स्पर्धा, वैयक्तिक identity वगैरे सुकर झाली आहे.


पण पूर्वीच्या आकाशात झेपावणाऱ्या आणि घिरट्या घालणाऱ्या आणि त्यांना शिट्ट्या , आरोळ्या , आणि तर्हतर्हेचे आवाज काढून लोकांचे आणि कबुतरांचॆ लक्ष वेधून घेणाऱ्या बहाद्दरांचॆ दर्शन फ्लॅट संस्कृती मुले दुर्मिळ झाले आहे. आता हा छंद गाव बाहेरच्या भागात स्थलांतरित झाला आहे, पिंपळे गुरव, खडकवासला, अशा ठिकाणी धाबळी दिसून येतात . त्यातच कबुतरांपासून होणाऱ्या "High sensitivity pneumonites" च्या प्रादुर्भावामुळे उघड्यावर कबुतरांना खायला घालण्यावर बंदी आहे. तरीही आज पुण्यामध्ये ५००० च्या आसपास नोंदणीकृत धाबळी आहेत असे ऐकले आहे .त्यांची संस्था सुद्धा कार्यरत आहे .पक्षीमित्र संघटना ही नोंदणीकृत संस्था, वेगवेगळ्या धाबळीची नोंदणी करते, रेसेस चे आयोजन करते.


एकंदर काय तर हा जुन्या जमान्यातील शौक आज हि तग धरून आहे.


Disclaimer: Photographs not taken by me. Credits belong to the original photographs.

131 views0 comments

Commentaires


bottom of page