ब्रह्मदेवाच्या विश्व निर्मितीचे काम मूर्त स्वरूपात आणण्याचे काम त्याचा , रचनाकार, स्थापत्यकार , वास्तुशिल्पी , वगैरे अनंत विद्यांचा सर्वे सर्वा असा विश्वकर्मा याने केले . त्याच्या काही पुत्रांपासून विविध व्यावसायिकांचा जन्म झाला. त्यात मनू ( लोहारकाम) दैवज्ञ ( सोनार ) शिल्पी ( दगड काम ) , त्वष्टा ( धातू काम )आणि मय( वास्तू कला ) हे ते पाच मुलगे होत .
त्याचा पुत्र त्वष्टा हा तांबट लोकांचा जनक .
कास्य धातूपासून निरनिराळ्या वस्तू बनविणाऱ्या या कारागिरांना "कासार "असे म्हणतात आणित्यांच्या समाजाला
"त्वष्टा कासार समाज" असे म्हणले जाते. यांच्यात जीनगरी ( पितळ) , व तांबट ( तांब्याचे काम )असे उप भेद आहेत. कासार हा रूढार्थी. कास्य किंवा ब्रॉन्झ याच्याशी निगडित असला तरी हे लोक , तांबे , पितळ ,कास्य ( कास्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल ) या सर्व धातूंचे काम करण्यात निपुण आहेत .पूर्वीच्या काळात मधुर नादाच्या मोठ्या घंटांचे निर्माण कार्य हाच समाज करीत असे . आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यातले जंतू मारण्याचे तसेच ऍसिडिटी कमी करण्याचे गुणधर्म आहेत . त्याचप्रमाणे पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे . म्हणूनच पूर्वी नदीच्या पात्रात तांब्याची नाणी टाकण्याची पद्धत होती .
असे हे तांबट सुमारे १७ व्या शतकात , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , आणि कोकणपट्टी मधून पुण्यात आले.यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या पासून तोफ गोळ्या ची आणि इतर शस्त्रांची निर्मिती करत .
वेद काळात , गदा , मुकुट , इत्यादी बनवत असत असे म्हणले जाते .
नंतरच्या काळात मात्र यांनी भांड्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. धातूवरील बारीक नक्षीकाम हे पण त्यांचेच कसब !
घंगाळी, डेचक्या , तपेली , तांब्ये , पूजेची उपकरणे इत्यादी हाताने ओतून , घडवून , ठोके देऊन ( हॅमर टोनिंग ) त्याची उत्कृष्ट उपकरणे बनवणे हा यांचा व्यवसाय होता . कसबा पेठेच्या अगदी जवळच , पवळे चौकाजवळ यांची वस्ती होती , त्या जागी अगोदर , सोनार व ब्राम्हण राहत असत .या सर्व कारागिरांच्या व्यवसायांवरून त्यांच्या वस्त्यांची नावे पडली .
वानगी दाखल , शिंपी आळी , भोई आळी , फणी आळी , तांबट आळी , कासार आळी , लोणारआळी , इत्यादी .
पूर्वापार यांची घरे बसकी , एक मजली , कौलाचे किंवा पत्र्याचे छत अशा तर्हेची आणि अरुंद बोळात असत. कामाच्या जागेतच वरच्या मजल्यावर अथवा मागच्या खोल्यां मध्ये ह्यांचे घर असे .
आजही येथे जाण्यासाठी असंख्य , बोळ , गल्ल्या , गटारे , तुडवत जावे लागते .
कायम ठोके मारणाऱ्या कारागिरांचा ठकठकाट , भट्ट्या मधून बाहेर पडणारे धूर , लेथ मशीनचा घराघराट , अशा संमिश्र आवाजाची आणि वासाची सरमिसळ असे वातावरण इथे बघावयास मिळते. उत्कृष्ठ देशी घाटाची भांडी , आकर्षक पितळेचे जुन्या डिझाईनचे दिवे , चकचकीत आणि झळझळीत उपकरणे मनाला भुरळ न पाडतील तरच आश्चर्य.
प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील च्या वाढत्या उपयोगामुळे व इंपोर्टेड कमी कसाच्या वस्तूंपुढे ह्याधंद्याला उतरती कळा लागली, याचा उल्लेख १८८५ च्या गॅझेटियर मध्ये सुद्धा आहे . पण अलीकडच्या अँटिक इंटेरिअर्स मध्ये जोरदार वापर सुरु झाल्यावर या धंद्याला बरकत येऊ लागली आहे . तांब्याची घंगाळी , पितळेचे लामण दिवे , तांब्याचे बंब , कॉपर बॉटल्स , ठोक्याची छोटी वाढायची भांडी यांचा वापर मुक्त हस्ते वापरण्याची फॅशन सध्या "अगदी इन " आहे.
पण तरीही ही हस्त कला हळू हळू लयास जाऊ लागली आहे. भालचंद्र कडू यांच्या सारख्या कसबी कारागिराने किमान एक हजार लोकांना हि कला शिकविण्याचा विडा उचललेला आहे .
स्वतः भालचंद्र कडू आठव्या पिढीतील तांबट असून त्यांनी २ महिने अमेरिकेतल्या येल , आणि ऍरिझोना विद्यापीठात या कलेचे त्यांनी शिक्षण दिले आहे. प्रगतिशील विचारांच्या भालचंद्र कडूनी गेली ३० वर्षे नव नवीन वस्तू निर्माण करण्यात घालवलीआहेत .
त्यांच्या नुसार उत्कृष्ठ ठोके मारणारे जेम तेम १०-१२ लोक राहिले आहेत. या ठोके मारण्याच्या कामाला "मठार काम" असे म्हणतात. आता हा धंदा पसरत पसरत बोहरी आळीतल्या भांडे अळी पर्यंत पोचला आहे .
पंच तारांकित रिसॉर्ट्स मध्ये दिसणाऱ्या या आकर्षक वस्तूंचे निर्माते मात्र बरेचसे तशाच. दाटीवाटीच्या पेठात धुरकट वातावरणात , आणि धोकेदायक मेटल डस्ट मध्ये , आगीच्या धगीत , ऍसिड मध्ये कुठल्याही पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणा शिवाय काम करत आहेत .
पुढच्या वेळी तांब्याच्या ताम्हनांचा, काश्याच्या थाळ्यांचा, हॉटेलातल्या ठोक्याच्या तांब्यांच्या भांड्यांचा वापर करताना या पाठच्या कारागिरांची आठवण जरूर ठेवा .
तसेच एकदा या आकर्षक वस्तूंच्या निर्मिती कारागिरांच्या आळीला जरूर भेट द्या .
INTACH ही प्रसिद्ध संस्था ह्या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी ( Revival ) भरपूर काम करीत आहे .
पण या समाजातली तरुण पिढी मात्र या कलेकडे पूर्ण पाने पाठ फिरवून इतर जीवनोपयोगी शिक्षणघेत आहे .
उत्कृष्ठ अशा एका हस्त कलेचा लोप होत चालल्याची हुरहूर आणि दुःख मात्र खूपच अस्वस्थ करणारी आहे .
Photographs are not taken by me. Copyrights belong to original owners of the photographs.
Opmerkingen