अलीकडेच टिळक रोड , पेरू गेट भागात जाण्याचा योग आला
जुन्या पुण्याच्या खुणा मिरवत दोन ठिकाणे डोळ्यात भरली आणि डोळ्यातून ,
मनाच्या स्मृती कोषात , आणि तिथून पूर्व काळातल्या आठवणी जागवत लहान पणात घेऊन गेल्या .
फार अद्वितीय अशी हि दोन स्थळे नव्हती , पण त्या काळात असंख्य गरजवंतांचे
उदर भरण करणारी नक्कीच म्हणता येतील .
त्यातले एक म्हणजे " मणी अप्पा उडुपीकरांचे " पुणे बोर्डिंग हाऊस " आणि छत्र्यांचे "बादशाही "
त्यांचे महत्व हॉटेलपेक्षा " घरगुती खानावळी " म्हणूनच जास्त होते ( बादशाहीचे )
माझ्या बालपणात नंबर लावून रस्त्यावर थांबणारी आणि महिनावारीने जेवणारी असंख्य लोकं मी पहिलीआहेत.
विद्यार्थी , चाकरमाने आणि इतर गावाहून आलेल्या आणि घर संसार नसणाऱ्या लोकांना घरगुती जेवणदेणाऱ्या या खानावळीचे महत्व अनन्य साधारण होते .
बहुदा मेंबर मंडळी पुरुषचं असत.
साधारण १८८० च्या सुमारास आगरकरांनी ह्या संकल्पनेचा वृत्तपत्रातून आवर्जून उल्लेख केला होता , त्यांच्यानंतर चिपळूणकरांनी सुद्धा त्याचा हिरीरीने पुरस्कार केला होता .
अशी पहिली खानावळ , नारायण रामचंद्र पोंक्षे या गृहस्थाने जून १८८१ मध्ये केली , त्याचे नाव होते " पुणेभोजन गृह "परंतु दुर्दैवाने ती खानावळ १८८४,मध्ये बंद पडली . उधारीची परतफेड वेळेत न होणे भांडवलाचीतजवीज न होणे , एकसूरी मेनू ,या कारणांमुळे ही खानावळ तग धरू शकली नाही .
चिपळूणकरांनी १८८२ मध्ये "केसरी" त लिहिलेल्या एका लेखा द्वारे लोकांना या संकल्पनेचे महत्व , गरज , आणि सोय , याबाबत आणि वेळोवेळी महिन्याची फी भरण्या बाबत कळकळीची विनंती केली होती.
आगरकरांना सुद्धा विधवा पुनर्वसन आणि त्यांना मानाने जगण्यासाठी एक उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून हीकल्पना फार आवडली होती .
त्या काळी पुण्यात कमान १०-१२ मोठी भोजनगृहे असावीत असे आगरकरांचे स्वप्न होते
काळानुसार विद्यार्त्यांची संख्या वाढत गेली , गॅझेटियरच्या, आकडेवारी नुसार १८८५ मध्ये असणाऱ्या ४०००विद्याथ्यांची संख्या १९१० पर्यंत १०,००० च्या आसपास पोहोचली होती .
शिवाय १८८० मध्ये नव इंग्लिश स्कुल सारख्या शिक्षण संस्थांची स्थापना झाली.
आणखीनही शिक्षण संस्था या काळात उदयाला आल्या
त्या बरोबर बाहेर गावचे विद्यार्थी सुद्धा आले .
साधारण १८९९ च्या सुमारास संस्कृतचे आणि पाली भाषेचे गाढे विद्वान श्री . धर्मानंद कोसंबी विद्यार्थी म्हणूनगोव्यातुन पुण्यात आले होते.
भांडारकरांनी नगरकर वाड्यातल्या संस्कृत विद्यालयात त्यांच्या शिक्षणाची सोय केली .
पण कोसंबींची जेवणाची सोय कोठे होईना . त्या काळात अशा खानावळी फक्त ब्राह्मणांसाठी चालवल्याजात . शिवाय जेवण झाल्यावर. पान उचलून शेणाने त्या जागेवरचे सारवण मेम्बरने करायचे असा दंडक होता .
कोसंबी पडले सारस्वत , त्यामुळे त्यांना इथे मज्जाव होता , श्री रेडकर नावाच्या परिचितांच्या ,मिनतवारीआणि मध्यस्थीने त्यांची तिथे सोय झाली , आणि ८ आणे जास्तीचे दिल्यावर मालकाने त्यांचे सारवण स्वतःकरण्याचे कबुल केले.
फोडणीचे वरण , भाजी आणि भाकरी, भात , ताक असे मोजकेच पदार्थ होते , पोळी आणि तुपासाठी १रुपया जास्त द्यावा लागायचा .
तालेवार घरातली मुले येताना स्वतःची तुपाची लोटी घेऊन येत . लाडू आणि चिवडा कधी काळी मिळत असे.
केसरीचे सहसंपादक श्री ज. स.करंदीकर यांच्या नुसार त्या सुमारास महिन्याचे साधारण ३० रु साधारणमेम्बरला महिना खर्च करावे लागत.
विष्णुशास्त्री चिपळूणकरानी स्वतः काही पैसे या व्यवसायात गुंतवले होते .
त्या काळी ना वडा पाव , ना मिसळ , ना रामनाथ , बेडेकर किंवा ,काटा कीर , ना जोशी वडेवाले , ना गार्डनवडा पाव .
कालांतराने , हि खाणावळ संस्कृती रुजली , आणि वेगळ्या रूपात बहरली ,
उडपीकरांचे पुणे बोर्डिंग (९५ वर्ष जुने)छत्र्यांचे बादशाही (९२ वर्ष जुने )-मुरलीधर लंच होम , अशा शाकाहारी , आणिसदाशिव पेठेतली आवारे मराठा खानावळ (१०५ वर्ष जुनी ), गणेश पेठेतली नेवरेकर हेल्थ होम , शुक्रवारपेठेतले आसरा , आणि प्रभाकऱ लंच होम , हॉटेल दुर्गा. अशा मांसाहारी खानावळी सुरु झाल्या .
थोड्या काळानी घरगूती मेस सुरु झाली ,कुमठेकर रस्त्या लगतची घारे मावशींची , ज्ञान प्रबोधिनी जवळच्या
मालवणकर मावशींची , अशी अस्सल घरगुती आणि घरातच जेवण देणारी आणि कमी गर्दीची मेस हि एक
समांतर व्यवस्था सुरु झाली आणि लोकप्रियही झाली .
१९१२,च्या सुमारास सुरु झालेले रविवार पेठेतले वैद्य उपहार गृह , (जिथे टिळक मिसळ खाण्यास जात असत) , केसरी वाड्या जवळचे " प्रभा उपहार गृह " इत्यादी उपहार गृह नावाला आली आणि आजतागायत वेगळ्या स्वरूपात ,पण
जुना वारसा सांभाळत चालू आहेत
प्रभा उपहार गृह मधला बटाटे वडा १९४० सालापासून प्रसिद्ध आहे . सरस्वतीबाई परांजपे यांनी सुरु केलेले हेउपहार गृह मात्र पुणेरी परंपरा चालवत दुपारी १२ ते ४ बंद आणि आठवड्याची एक सुट्टी याच नियमानेचालवले जाते.
काका छत्र्यांच्या "बादशाही "च्या बोर्ड वर आमची कुठे शाखा नाही पासून आतल्या सडेतोड व फटकळ पुणेरीपाट्यांची रेलचेल आहे ( पूर्वीपासून )
कदाचित अशा पुणेरी पाट्यांचे मूळ जनक व प्रसिद्ध वकील प्र. बा. जोग येथून हाकेच्या अंतरावर राहतअसल्याचा हा प्रादुर्भाव असेल .
मधल्या काळात वेवेगळ्या जात कुळींची आणि पाक शैलींची -पहिली वहिली हॉटेल्स आली - जंगली महाराजरस्त्यावरचे बंगाली पद्धतीच्या जेवणाचे "कलकत्ता बोर्डिंग हाऊस ",
जिमखाना बस स्टॅन्डचे मागे असलेले गोवेकरी "गोमंतक " आणि दाक्षिणात्य पद्धतीचे "पुना कॉफी हाऊस ,
पारशांची "गुड लक " "लकी " आणि महाराष्ट्रीय पद्धतीचा. आपटे रोड वरचा "आशा डायनिंग हॉल ", लिमयांचे "पूनम " चितळ्यांचे " श्रेयस "अशी वानगी दखलची उदाहरणे देता येतील .
पुढे खाणावळींची -उपहार गृहे , उपहार गृहांची हॉटेल्स आणि पुढं त्याचे डायनिंग हॉल अशी स्थित्यंतरे झाली.
फोडणीचे वरण , पोळी भाजी , वरून मंचुरीयन , व्हेज हरा भरा , चिकन हंडी , दाल माखनी असा आंतरराज्यीयआणि अंतर राष्ट्रीय पाक शैलीतली हॉटेल्सने चंचू प्रवेश केला .
सुकांता , पंचवटी गौरव , सपना ,सारखी गुजराती मारवाडी पदार्थांची रेलचेल असणारी हॉटेल्सही आली .
पूर्वीच्या जुन्या खाणावळींमधले मधले जेवणा अगोदरचे " चित्रावती " आणि "अपोष्णी "सारख्या वैदिकअन्नशुद्धि संस्कारांचे रूपांतर " चीअर्स " मध्ये झाले आणि जेवणा नंतरच्या हस्त प्रक्षालनाचे संस्कारलिंबाच्या फोड टाकलेल्या गरम पाण्याच्या "फिंगर बाउल " मध्ये विसर्जित झाले .
अपेयपान आणि अभक्ष भक्षण ह्या शुचितेच्या संकल्पना मोडीत निघाल्या
.
कॉंटिनेंटल , लेबनीज , चायनीज आहे परकीय मेनूने भरलेली , आणि नाना विध खाद्य व्यंजनांनी सजलेली , आणि भारतीय जिभेला आणि पोटाला भावणारी , पण खिशाला कात्री लावणारी -अनंत रेस्टोरेंट्स आली , स्थिरावली आणि फोफावली .
हळू हळू पुणे ही खाद्य नागरी मध्ये रूपांतरित झाली .
पण काळाचा महिमा अगाध आहे , फिरून एकदा मासे मटणाच्या खानावळी , चुलीवरचे मटण ,धुराचीबिर्याणी , अक्खा मसूर , पिठले भाकरी , यांचा काळ सुरु झाला आहे , "संपूर्ण घरगुती चवीचे " हे आकर्षितकरणारे विशेषण झालेले आहे ,
लेकी , बाळी , सुना , आणि इष्ट मित्र परिवारासह जाण्यासाठी योग्य असणारी
मांसाहारी -सुर्वे, भालेकर , जगदंबा, तिरंगा , एस, पी ज , दुर्गा पासून ,
शाकाहारी दुर्वांकुर, जनसेवा , अभिषेक , श्रेयस पर्यंत मोठी नामावली आज तयार आहे
एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे काळाच्या ओघात ,पेठांमधल्या शाकाहारी आणि मांसाहारीखाद्य शैलीच्या सोवळ्या ओवळ्या मानसिकतेचा पार ऱ्हास झाला .
पुणेरी संस्कृतीचा मध्य बिंदू समजल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतच मटणाची हॉटेल्स आली - पेरू गेटजवळचेमानकरांचे मांसाहारी "गोपी " शुद्ध शाकाहारी "पूना बोर्डिंगच्या "समोरच उभे ठाकले .
पुढच्या चौकात शाकाहारी "सात्विक थाळीशी "लागून पारशिवनीकरांचेन सावजी पद्धतीचे मांसाहारी "हॉटेल
नागपूर "आले .
"मी राहत होतो त्या ब्राम्हण. कार्यालयाच्या अगदी जवळ " मराठा दरबार " ने तळ टाकला तर कुमठेकररस्त्यावरचे " आवारे मटणाची खानावळ " "हॉटेल साई " ज्ञान प्रबोधिनीशी लगट करू लागले ( आवारे यांचे हॉटेल ज्ञान प्रबोधिनीपेक्षा जुने आहे )
असो बराच लेखन प्रपंच आणि स्थित्यंतरे पहिली ,तरीही महाराष्ट्र व्यायाम मंडळातून घरी येताना पूना बोर्र्डिंगच्या खाणावळीतून येणारा खरपूस पोळ्या, आणि विशिष्ट स्वादाच्या गोडसर आमटी भाजीचा,जठराग्नी उद्दीपित
करणारा , संमिश्र आणि सात्विक दरवळ , आजही माझ्या गंध कोषांमधून निघत नाही .
खानावळी ते तारांकित हॉटेल्सच्या ह्या खाद्य प्रवासाचा मी एक भाग्यवान साक्षीदार आहे .
पण ह्या अफाट खाद्य संस्कृतीचा आनंद घेताना , आपल्याला , आगरकर , चिपळूणकर , आणि पुण्यातलीपहिली खानावळ चालू करणारे नारायण रामचंद्र पोंक्षे यांचा विसर पडता कामा नये .
आगरकर, चिपळूणकर , पोंक्षे ही त्रयी खरे तर आताच्या
"आधुनिक पुण्याच्या "खाद्य संस्कृतीचे आद्य शिल्पकार " असे म्हणले तर वावगे ठरणार नाही
रणजित घाटगे
१५ जुलै २०२२
साभार संदर्भ :- चिन्मय दामले ( हिंदुस्थान टाइम्स ) व इतर संदर्भ
तळ टिप :- १) कॉव्हिडच्या २ वर्षाच्या काळात काही बदल झाले असतील तरी ह्यातील बऱ्याच हॉटेलचे तगडेब्रँड्स. असल्याने बंद पडले नसतील अशी अपेक्षा आहे.
२) आर्टिकल आय पॅड वर लिहिले असल्याने ते फोन वर वाचताना फॉरमॅटिंग मध्ये शब्द नको तेथे तुटतात , तरी संदर्भ लावून वाचावे
Thanks,Uday (Baba)
Compliments from a non Puneite means a lot more than Punekar.
Though Punekars can relate and identify many of these places, as their childhood bouquet of memories.
🙏🙏🙏
Bhau, very informative , tranzition of food culture well described. Though I am not a punite by birth, I have throughly enjoyed my stay in Sadashiv Petha, and has tested Food and Amrut tulya chaha.The taste still lingers and makes me nostalgic.
Have tested food in some of the traditional eatries. Good write. Keep it up.
फारच सुंदर लिहिले आहे .जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
तात्कालिक संदर्भ आणि माहितीने गच्च भरलेला लेख वाचून पुण्य नगरीची खाद्य संस्कृती डोळ्यासमोर उभी राहिली. एकेका ठिकाणाची विस्तृत माहिती आणि रसग्रहण करणारे लेख अवश्य लिहावे. मजा येईल.
अतिशय सुंदर व nostalgic करणारा अप्रतिम लेख.... रणजित दादा, अजून लिहा.
यह दिल मांगे more....🍁🍁🍁